
MAHA NEWS : पाटस : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (NH-65) वरील पाटस टोल प्लाझा परिसरात नुकतेच करण्यात आलेल्या रस्त्याचा काही भाग खचल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी रस्त्याचा डांबरी थर तुटून खालील भाग उघडा पडल्याचे दिसत असून, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, डांबरीकरणाच्या खाली मातीचा भराव करण्यात आल्यामुळे रस्ता अल्पावधीतच खचला, असा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी संबंधित कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून, कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


