
मुंबई | दिनांक 09 जुलै 2026
MAHA NEWS : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्यानुसार, शेतीच्या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या गाळ, माती आणि मुरुमावरील रॉयल्टी (स्वामित्व धन) पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विहीर, गोठा, शेतरस्ता, शेतघर आणि शेती सुधारणा यांसाठी लागणारे गौण खनिज आता अतिरिक्त शुल्क न भरता वापरता येणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयानुसार शेतकरी स्वतःच्या शेतातील किंवा शासनाच्या नियमांनुसार उपलब्ध असलेल्या गाळ, माती आणि मुरुमाचा वापर शेतीच्या कामांसाठी करू शकतील. यासाठी यापूर्वी आकारण्यात येणारी रॉयल्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शेती विकासाचा खर्च कमी होऊन हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होणार आहे.
सरकारने परवानगी प्रक्रियाही सुलभ केली आहे. शेतकऱ्यांना फक्त स्थानिक तलाठ्याकडे साधा अर्ज करावा लागेल आणि संबंधित अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या आत परवानगी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये संबंधित विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.
महत्त्वाची बाब म्हणजे, स्वतःच्या शेतीच्या वापरासाठी गाळ किंवा मुरुम वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रक किंवा बैलगाड्या अडवून दंडात्मक कारवाई करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कोणताही अधिकारी विनाकारण त्रास देत असल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही महसूलमंत्र्यांनी दिला आहे. मात्र, या सवलतीचा व्यावसायिक वापर केल्यास विद्यमान कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
या निर्णयामुळे शेततळी, विहिरी, गोठे, शेतरस्ते आणि जलसंधारणाची कामे अधिक कमी खर्चात आणि जलद गतीने पूर्ण होण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात असून राज्यभरातील शेतकरी संघटनांनीही त्याचे स्वागत केले आहे.

