ठाण्यातील मुंब्रा परिसरातील खाडी किनाऱ्यावर एका व्यावसायिकाकडून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. अनधिकृतपणे तेथील मौल्यवान कांदळवन नष्ट करून संबंधित जागेवर भरणी करण्यात येत होती आणि त्या जागेवर बेकायदेशीररित्या मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात होता.

कांदळवन हे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी तसेच पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नताशा आव्हाड आणि नगरसेविका मनीषा भगत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेले सर्व बेकायदेशीर प्रकार त्वरित थांबवण्याची सक्त ताकीद संबंधितांना दिली. तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,अशी आग्रही आणि स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. यावेळी मुंब्रा परिसरातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिसरातील नैसर्गिक संपत्ती आणि जनतेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *