MAHA NEWS96 : पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी संयुक्त कारवाई करत राज्यातील मोठ्या भेसळयुक्त (सिंथेटिक) दूध रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली असून २६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी १,००० लिटर शुद्ध दुधामध्ये सुमारे ५०० लिटर रसायनांपासून तयार केलेले सिंथेटिक दूध मिसळून बाजारात विक्री करत होते. हे बनावट दूध तयार करण्यासाठी शॅम्पू, डिटर्जंट, पाम तेल, स्किम्ड मिल्क पावडर, इमल्सिफायर आणि इतर रसायनांचा वापर केला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

मंचर परिसर हा या रॅकेटचा मुख्य केंद्रबिंदू असल्याचा संशय असून, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना, ठाणे, जळगाव आणि धाराशिव या जिल्ह्यांपर्यंत या जाळ्याचा विस्तार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. संयुक्त पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून सुमारे २०,००० लिटर संशयित भेसळयुक्त दूध नष्ट केले, अनेक नमुने तपासणीसाठी जप्त केले तसेच संबंधित पाच अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित केले.

FDA आयुक्तांनी सांगितले की, दूध हे लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी अत्यावश्यक अन्न आहे. त्यामुळे दुधामध्ये रासायनिक भेसळ करणे हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजाविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणातील संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *