
Maharashtra: राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेला वाद आता निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. चालक संघटनांनी ४ मेपासून संपाचा इशारा दिला होता. मात्र, आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याची सरकारची तयारी आहे. त्यानुसार, मराठी भाषा शिकण्यासाठी आता १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य सरकारने १ मेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिणे, वाचणे आणि बोलणे अनिवार्य केले आहे. या निर्णयामुळे अनेक चालक संघटनांनी नाराजी व्यक्त करत संपाचा इशारा दिला होता.
दरम्यान, मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिला की, मराठी भाषा शिकण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. “मराठी शिकणारच नाही ही मुजोरी चालणार नाही,” असे ते ठामपणे म्हणाले. सरकारच्या या निर्णयामुळे संभाव्य संप टळण्याची शक्यता वर्तवली जात असून, येत्या काही दिवसांत यावरअंतिम भूमिका स्पष्ट होणार आहे.



