देशात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि छोटे व्यवसाय अडचणीत आले आहेत. याचा थेट परिणाम अन्नपदार्थांच्या किमतींवर होऊ शकतो.

माहितीनुसार, १ मे २०२६ पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ९९३ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये व्यावसायिक सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. घरगुती १४.२ किलो सिलेंडरचे दर सध्या स्थिर ठेवण्यात आले असले तरी भविष्यात त्यातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरवाढीमागे पश्चिम आशियातील तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील पुरवठा अडथळे हे मुख्य कारण मानले जात आहे. भारतातील मोठ्या प्रमाणातील एलपीजी आयात या मार्गाने होत असल्याने पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. परिणामी तेल कंपन्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला असून किंमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सरकारने एलपीजी वितरणासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. नवीन गॅस कनेक्शनवर तात्पुरती मर्यादा, ओटीपी आधारित डिलिव्हरी व्यवस्था आणि रिफिल बुकिंगमधील अंतर वाढविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शहरी भागात २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांचे अंतर अनिवार्य करण्यात येण्याची शक्यता आहे.

या दरवाढीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना, स्थलांतरित कामगारांना आणि लहान व्यवसायिकांना बसत आहे. ५ किलोच्या छोट्या सिलेंडरच्या किंमतीतही सुमारे २६१ रुपयांची वाढ झाल्याने भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि कामगारांचे मासिक बजेट बिघडले आहे.

तज्ज्ञांच्या मते, गॅस दरवाढीमुळे आगामी काळात हॉटेलमधील जेवण, चहा-नाश्ता, बेकरी पदार्थ तसेच दैनंदिन वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा दबाव आणखी वाढू शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *