
पाटस :-“टोलचा झोल उघड करणार”अविनाश मोहिते.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोल प्लाजा प्रशासनाविरोधात गंभीर आरोप पुढे आले असून संभाजी ब्रिगेड पुणे यांच्या वतीने याबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी दिलेल्या निवेदनानंतरही कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अविनाश मोहिते, महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे असे म्हणाले की, पाटस टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून प्रशासन “तोंड बघून” काम करत आहे. मोजक्या लोकांना टोल माफी देण्यात येते, तर सर्वसामान्य गावकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. टोल नाक्यावर गुंडागर्दीचे प्रकार घडत असून अनेक वेळा वाहनचालकांवर मारहाणीच्या घटनाही समोर आल्या आहेत.
ऑनलाइन टोल वसुली सुरू असतानाही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, मात्र याकडे प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. याचा फटका ॲम्बुलन्स, स्कूल बस आणि अत्यावश्यक सेवांना बसत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
तसेच सोलापूर महामार्ग हा पालखी मार्ग असून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या आणि वारकऱ्यांना टोल माफी दिली जात नाही, यामुळे धार्मिक भावनाही दुखावल्या जात आहेत. याशिवाय बस थांब्यांचा अभाव, अस्वच्छ शौचालये, अपूर्ण सर्व्हिस रोड, स्ट्रीट लाईट नसणे, टोल फ्री नंबर बंद, तक्रार पुस्तिका उपलब्ध नसणे, तसेच पारदर्शकतेचा पूर्ण अभाव अशा अनेक तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
या सर्व प्रकारामुळे पाटस परिसरातील नागरिकांना सरसकट टोल माफी द्यावी आणि टोल प्रशासनाने सर्व माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तात्काळ या सर्व मागण्यांवर अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुढील काही दिवसांत चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. उद्भभवणाऱ्या सर्व परिस्थितीस टोल प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील, याची गंभीर दखल घ्यावी.

