Kalyan News: कल्याणमध्ये मराठी भाषेच्या सक्तीवरून राजकारण चांगलेच तापले असून मनसे आणि काही संघटना समोरासमोर ठाकण्याची शक्यता आहे.

Kalyan News: कल्याणमध्ये मराठी भाषेच्या सक्तीवरून राजकारण चांगलेच तापले असून मनसे आणि काही संघटना समोरासमोर ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 4 मे रोजी मराठी सक्तीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. यामुळे येत्या काळात कल्याणमधील वातावरण अधिक तणावपूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक

कल्याणमध्ये मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसेने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. काही संघटनांनी मराठी सक्तीच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली असली तरी, मनसेने याला चोख प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. मराठी रिक्षा चालकांना कोणी त्रास दिला किंवा मराठी भाषेचा विरोध केला, तर त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात मनसेच्या वतीने कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही देण्यात आले आहे.

मराठी रिक्षा चालकांना पाठिंबा देण्यासाठी मनसेने एक नवीन पाऊल उचलले आहे. मराठी चालकांच्या रिक्षांवर विशेष स्टिकर्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार आणि चालकांचे समर्थन केले जाणार आहे. मनसे पदाधिकारी योगेश पाटील यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली असून, मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी मनसे कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आरटीओ प्रशासनाकडे ठोस मागण्यांचे निवेदन

 माजी आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) जाऊन प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक सेवा क्षेत्रात मराठीचा वापर अनिवार्य आहे. मात्र, अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *