
राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह सुरू असतानाच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील नरसापूर परिसरात ही घटना घडली. सुट्टीमुळे चिमुकली आजोळीकडे आली होती. खेळत असताना आरोपीने तिला फूस लावून रस्त्यालगत नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने मृतदेह झुडपात लपवून ठेवण्याचाही प्रयत्न केला.
दरम्यान, चिमुकली बराच वेळ दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना तिचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत तातडीने पोलिसांना कळवले.
घटनेबाबत कळताच संतप्त गावकरी रस्त्यावर उतरले. मुंबई-बंगळूर महामार्गावर रात्री रास्ता रोको करण्यात आला. आरोपीला पकडून आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी गावकऱ्यांनी लावून धरली. त्यानंतर मोठा जमाव हा पोलिस ठाण्याबाहेर जमला. जोपर्यंत या नराधमाला फाशी देत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला.
नसरापूर येथील अमानुष आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बोलणे झाले आहे. हे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. सुप्रिया सुळे ह्या सातत्याने शासन आणि प्रशासनाच्या संपर्कात असून पिडितेला न्याय मिळेल या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की, गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पिडितेला न्याय मिळावा ही आपणा सर्वांचीच भूमिका आहे. आपण सर्वांनी याबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेची पोलीस प्रशासनाने दखल घेतली आहे. कृपया, आपण सर्वांनी याप्रकरणी संयम राखावा. याप्रकरणी दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई होईल.असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले..



