
ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय महिला कुस्तीपटू Vinesh Phogat हिने भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष Brij Bhushan Sharan Singh यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप करत मोठा खुलासा केला आहे. विनेश फोगटने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून सांगितले की, बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार करणाऱ्या सहा महिला कुस्तीपटूंमध्ये ती स्वतःही एक पीडित आहे.
विनेश फोगटने सांगितले की, हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू असल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पीडितेची ओळख गुप्त ठेवण्याची अट असल्यामुळे तिने आतापर्यंत मौन बाळगले होते. मात्र आता परिस्थितीमुळे तिला स्वतःची ओळख जाहीर करावी लागली.
तिने उत्तर प्रदेशातील गोंडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओपन रँकिंग कुस्ती स्पर्धेबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली. गोंडा हे बृजभूषण शरण सिंह यांचे प्रभावक्षेत्र असल्याने तिथे निष्पक्ष स्पर्धा होईल का, याबद्दल तिने शंका उपस्थित केली. पंचगिरी, गुणांकन आणि सामन्यांचे निर्णय यावर त्यांच्या लोकांचा प्रभाव राहू शकतो, असा आरोप विनेशने केला.
विनेश फोगटने सरकारलाही थेट इशारा देत म्हटले की, स्पर्धेदरम्यान तिच्या टीममधील कोणासोबत काही चुकीचे घडल्यास त्याची जबाबदारी भारत सरकारची असेल. तिने क्रीडा मंत्रालय आणि प्रशासनावरही निष्क्रियतेचा आरोप केला.
या प्रकरणामुळे भारतीय कुस्ती क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २०२३ मध्ये दिल्लीतील जंतर-मंतर येथे महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्या आंदोलनात विनेश फोगट ही प्रमुख चेहरा होती.


